कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या ७६ गुंतवणकदारांची दीड कोटींची फसवणूक केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. याप्रकरणी मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
कंपनीमध्ये एक लाखांची गुंतवणूक केल्यास १० महिन्यांत टप्प्याटप्प्याने दीड लाख रुपये मिळतील. शिवाय गुंतवणूकदार आणल्यास कमिशन देण्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत ७६ गुंतवणूकदारांची सुमारे दीड कोटींची फसवणूक झाल्याची बाब चौकशीमध्ये समोर आली आहे.
नागेश थळी, सिद्धेश आडारकर आणि भास्कर भाताडे अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यामध्ये राहणारे राहिश मजिठीया यांना आनंद जाधव याने संपर्क साधत कॅमिओ हेल्थकेयर कंपनीमध्ये एक लाख रुपये गुंतवल्यास दहा महिन्यानध्ये दीड लाख रुपये मिळतील असे प्रलोभन दाखवले. तसेच गुंतवणूकदारांचे पैसे हे त्यांची कंपनी अतुल्य ग्रुप ऑफ कंपनीज, अँम्पल ट्री अॅग्रो मार्ट, महिला मार्ट, गेट माय विट टेक्नालॉजी प्रा. लिमिटेड, रोहन एंटरप्रायजेस तसेच शेअर मार्केट, क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवले जातात. आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्यातून गुंतवणूकदारांना परतावा दिला जातो, असेही आडारकर याने राहिश यांना सांगितले.
कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारीवर्ग आणि फंड मॅनेजर आहेत. तुम्ही गुंतवणूकदार आणल्यास कमिशन देण्याचे राहिश यांना प्रलोभन दाखवण्यात आले होते. त्यास बळी पडून राहिश यांनी कंपनीमध्ये दोन लाखांची तर, त्यांचे मित्र सौरभ ठाकूर, अमित भगत यांनीही प्रत्येकी एक-एक लाखांची गुंतवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राहिश यांनी कंपनीकडे पैशाची मागणी केली. मात्र, कंपनीने पैसे देण्यास नकार दिला. तर, गुंतवणूकदार आणल्यास त्यातून तुमचे पैसे दिले जातील, असे कंपनीकडून त्यांना सांगण्यात आले.